Ad will apear here
Next
‘भावार्द्र स्वरांचा ख्यालिया’


आज चार फेब्रुवारी २०२१. ख्यातकीर्त गायक भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी जागवलेल्या त्यांच्या या आठवणी....
...........
मी इतका भाग्यवंत नसेन, की मला त्यांच्या घरात जन्म मिळावा... मी इतका भाग्यवंत नसेन, की मला भारतीय अभिजात संगीत शिकता आले असते तेही त्यांच्याकडून... मी इतका भाग्यवंत नसेन, की मला एखादे साथीचे वाद्य वाजवता आले असते व मी त्यांची साथ-संगत करू शकलो असतो... किंवा इतकाही भाग्यवंत नसेन की मला त्यांच्याबरोबर काही प्रवास करायला मिळाला असता; पण माझ्या भाग्याची रचनाच नियतीने वेगळी केली होती. मी भाग्यवान अशासाठी, की मला माझ्या कॅमेऱ्यामुळे त्यांच्या एकदम जवळ जाता आले. १९८३ ते २००८ अशी तब्बल पंचवीस वर्षे मला त्यांच्या जिवंत अशा भावमुद्रा-गानमुद्रा अगदी जवळून टिपता आल्या. मी भाग्यवान अशासाठी, की माझ्या तीन प्रकाशचित्र प्रदर्शनांचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाले. मी भाग्यवान अशासाठी, की माझ्या पहिल्यावहिल्या थीम कॅलेंडरचे प्रकाशन ‘सवाई स्वरमंचावरून’ त्यांच्या हस्ते व्हायचे होते आणि मी भाग्यवान अशासाठी, की भारतीय टपाल खात्याला त्यांच्यावरचे टपाल तिकीट प्रकाशित करताना मी त्यांची टिपलेली भावमुद्रा वापरावी असे वाटले. होय... मी ख्याल गायकीतील पहिल्यावहिल्या भारतरत्नाविषयी सांगतोय. भावार्द्र स्वरांचा ख्यालिया अशा पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी सांगतोय.

मी काही अभिजात संगीताचा जाणकार नाही. मला त्याविषयी नितांत प्रेम व आवड आहे; पण हे प्रेम प्रेक्षकात बसून संगीत ऐकणाऱ्या सामान्य श्रोत्याचे आहे. श्रवणानंदात डुंबत असतानाच गळ्यात आलेल्या कॅमेऱ्याने मला समोरच्या कलाकाराच्या, तल्लीनतेत न्हाऊन निघालेल्या भावमुद्रा व त्यांची चित्रभाषा तितक्याच ताकदीने आकर्षित करते... म्हणूनही मी भाग्यवान!

१९८३च्या डिसेंबर महिन्यातील रात्र. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील रेणुका स्वरूप शाळेचे मैदान. सुप्रसिद्ध ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची’ पहिली रात्र. मी प्रथमच माझ्याबरोबर रंगीत फिल्म भरलेला एक एसएलआर कॅमेरा व एक छोटा फ्लॅश घेऊन त्या प्रांगणात प्रवेश केलेला. त्याआधी मी सहा वर्षे फक्त एक श्रोता म्हणूनच उपस्थिती लावलेली; पण आता आवडत्या कलावंत मंडळींना जवळून बघण्याची ओढ लागलेली. या ओढीनेच मला त्या स्वर-मंचापाशी खेचून नेलेले. गळ्यातील कॅमेऱ्याने हे सहजसुलभ झाले होते. स्टेजला नाक टेकेल इतक्या जवळ जाऊन मला प्रकाशचित्रे घ्यावी लागत होती. त्याचे कारण कॅमेऱ्यावर असलेली ५० एमएम फोकल लेन्ग्थची साधी लेन्स; पण इतक्याही जवळून भिंगातून बघताना जो आनंद मिळत होता त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. सुरुवातीच्या काही कलाकारांची प्रकाशचित्रे घेतली. स्टेजच्या लगतच मी उभा होतो. इतक्यात स्टेजच्या डाव्या बाजूची कापडी कनात बाजूला करीत पं. भीमसेन जोशी यांचे मांडवात आगमन झाले आणि ते स्टेजजवळ ठेवलेल्या एका खुर्चीवर आसनस्थ झाले. मी पहिल्यांदाच त्यांना इतक्या जवळून पाहत होतो. आतापर्यंत त्यांना मी त्यांच्या ‘एलपी रेकॉर्डस्’च्या मुखपृष्ठांवरच पाहिले होते. रेकॉर्डच्या फोटोतील तानपुरा खाली ठेवून ते थेट त्या खुर्चीत जाऊन बसले आहेत असा भास मला झाला. किती साधेपणा. किती सहजता. मला त्या वेळी कणभरही अशी कल्पना आली नाही, की या ‘स्वराधिराजा’च्या शेकडो भावमुद्रा मला पुढच्या अनेक वर्षांत टिपायला मिळणार आहेत... आणि त्याची सुरुवात त्या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या तानपुरा ट्यून करतानाच्या प्रकाशचित्रानेच होणार आहे.

पुढे दर वर्षी मी माझा कॅमेरा घेऊन ‘सवाई’ला जात राहिलो. १९८६च्या जून महिन्यात मी माझं पहिलं प्रकाशचित्र प्रदर्शन ‘स्वरचित्रांच्या काठावरती...’ या नावानं सादर केलं. बरेचसे कलाकार त्या प्रदर्शनाला भेट देऊन गेले; पण एका मोठ्या दौऱ्यावर असलेले भीमसेनजी मात्र येऊ शकले नाहीत. माझ्या मनाला याची खंत होती; पण त्यावर उपाय सुचला. डिसेंबर महिन्यात तेच प्रदर्शन मी रेणुका स्वरूप शाळेच्या पाठीमागील प्रांगणात असलेल्या भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात परत प्रदर्शित केले. या वेळी मात्र सवाई महोत्सवात कला सादर करायला आलेल्या अनेक कलाकारांनी व रसिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली. अर्थातच शेवटच्या दिवशी भीमसेनजी आवर्जून ते पाहायला आले. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अभिप्रायही लिहिला – ‘The best artists exhibition of photographs I have seen today - Bhimsen Joshi 13.12.86.’

माझ्या या प्रदर्शनाचे मला अनेक लाभ झाले. एक म्हणजे अशा प्रकारची माझी आवड लक्षात घेऊन मला खासगी मैफलींची निमंत्रणे मिळू लागली. कलाकारांशी ओळख होऊन त्यांचं प्रेम मिळू लागलं. त्यातील सर्वांत महत्त्वाचे कलाकार म्हणजे ‘सवाई महोत्सवाचे’ सर्वेसर्वा असलेले पं. भीमसेनजी. 

यातूनच मला हुबळीच्या डॉ. एस. एस. गोरे यांनी एक प्रदर्शन करण्याची संधी दिली. निमित्त होतं श्रीमती गंगुबाई हनगळ यांची पंच्याहत्तरी. विषय होता ‘किराणा घराणे.’ या घराण्याच्या काही कलाकारांची प्रकाशचित्रे मी टिपली होती; पण बीनकार बंदेअली यांच्यापासून तेव्हाची सगळ्यात तरुण असलेली गायिका मीना फातर्पेकर अशी प्रकाशचित्रे सादर करताना अर्थातच अनेक जुन्या कलावंताची प्रकाशचित्रे गोळा करणे, त्याचे उत्तमरीत्या कॉपिंग करणे, त्यांचे प्रिंट्स करणे, कालानुसार त्यांचे वर्गीकरण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या जुन्या कलावंतांची नावे जाणून घेणे असे कामाचे स्वरूप. मुंबई, मिरज, धारवाड, हुबळी अशा विविध ठिकाणी जाऊन संग्राहकांकडून किंवा कलाकारांच्या कुटुंबीयांकडून मी फोटो गोळा केले. बऱ्याच फोटोंमध्ये मुख्य कलाकाराच्या बरोबरीने इतरही काही व्यक्ती असत. फोटो देणाऱ्याला त्यांची नावे माहीत नसत अथवा ते अंदाजाने नावे सांगत. यावर एकमेव उपाय म्हणजे अशी कोणीतरी व्यक्ती गाठणे, की जी या अशा व्यक्तींनाही ओळखेल. मी भाग्यवान अशासाठी, की अशी एक व्यक्ती पुण्यात वास्तव्यास होती... आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या साधेपणामुळे मला त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचता येऊ शकत होते. ती व्यक्ती म्हणजे पं. भीमसेनजी. दशरथबुवा मुळे, फकीराप्पा कुंदगोळकर, नानासाहेब नाडगीर, वेंकटराव रामदुर्ग, कृष्णाबाई रामदुर्ग, ए. कन्नन, हुलगुर कृष्णाचार्य अशा कित्येक काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलावंतांना नाही तर कोणी ओळखले असते? पं. भीमसेनजींमुळे अशा कित्येक कलावंतांची नावे व त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी जाणून घेताना वेळ कसा निघून जाई हे कळतही नसे. अर्थातच या त्यांच्या मार्गदर्शनामुळे ‘किराणा घराणे’ हे प्रदर्शन परिपूर्ण झाले. आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक ७ फेब्रुवारी १९८८ रोजी हुबळीच्या ‘सवाई गंधर्व’ कलादालनात भीमसेनजी व सुप्रसिद्ध कन्नड लेखक के. शिवराम कारंथ यांच्या हस्ते झाले. प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट कधी वाया जात नाहीत. माझ्याबाबतही असेच झाले. मला याचे खूप मोठे बक्षीस मिळाले ते हे, की पं. भीमसेनजी मला नावाने ओळखू लागले.

सवाई गंधर्व महोत्सवात मला सहजासहजी ग्रीनरूममध्ये प्रवेश मिळू लागल्याने अनेक मोठ्या कलावंतांना जास्त जवळून बघता आले... ओळखता आले. त्या वेळी महोत्सव रात्रभर चाले. पहाटे पहाटे कडाक्याच्या थंडीत घरी जाताना त्या सत्रात घडलेले प्रसंग, सादर झालेली कला यांचा फेर मनात घेऊनच मी जात असे. एक प्रसंग आठवतोय, साल १९८८ असावे. दुसरा दिवस असावा. ग्रीनरूममध्ये पं. शिवकुमार शर्मा आपले संतूर हे वाद्य जुळवून तयार होते. पुढचे सादरीकरण त्यांचेच होते; पण आधीच्या कलावंताने खूप जास्त वेळ घेतलेला होता. पं. शिवजी जरा बेचैन झाले होते. इतक्यात ग्रीनरूममध्ये भीमसेनजी आले. नमस्कार झाले. शिवजींची बेचैनी भीमसेनजींच्या लक्षात आली. त्यांनी तसे विचारल्यावर शिवजी घड्याळात बघत म्हणाले, ‘पंडितजी, परफॉर्म करके हमें हॉटेल जाकर फिर एअरपोर्ट पहुँचना है। सात बजे हमारी फ्लाइट है। कैसे होगा यह?’ भीमसेनजींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. त्या काळी टेलिफोनचे एक खास कनेक्शन ग्रीनरूममध्ये घेतलेले असे. काळ्या रंगाचा फिरवून डायल करावा लागणारा फोन असे तो. पलीकडे बसलेल्या श्रीकांत देशपांडे यांना हाक मारून भीमसेनजींनी त्यांच्याकडून फोन घेतला. मांडीवर ठेवला. आणि डायल फिरवली. अर्थातच कोण्या अधिकाऱ्याला ते फोन करीत असावेत. पलीकडून फोन उचलला गेल्यावर ते म्हणाले, ‘नमस्कार! मी भीमसेन जोशी बोलतोय. तुम्हाला माहीत असेल, की सवाई गंधर्व महोत्सव सुरू आहे. आमचे एक आर्टिस्ट आहेत सकाळच्या फ्लाइटला. त्यांच्याकडे वाद्ये असणार आहेत. त्यांना पोहोचायला उशीर झाला, तर तेथे आल्यावर त्यांना जरा बोर्डिंगला मदत कराल का?’ पलीकडून अर्थातच होकार आला असणार. शिवजींकडे पाहत भीमसेनजी म्हणाले, ‘आप चिंता मत कीजिए अब। आपको लिये बगैर फ्लाईट जायेगी नहीं।’ अशा प्रकारे आश्वस्त केल्यावर मग मात्र शिवजी निश्चिंत झाले.

आज त्यांच्या कित्येक आठवणींनी मनात गर्दी केलीय. त्या आठवणींचा कॅलिडोस्कोप फिरवत मी त्यांच्या आठवणी जागवतोय. सन १९८९ची आठवण आहे. भीमसेनजी परदेश दौऱ्यावर गेले होते. जर्मनीत त्यांचे कार्यक्रम होते. माझा सख्खा काका त्या वेळी जर्मनीत व्याख्याता म्हणून वास्तव्यास होता. तेथून परत मुंबईला येताना माझ्या काकाला समजले, की त्या फ्लाइटमध्ये पं. भीमसेनजीही प्रवास करत आहेत. तो तर त्यांचा एकदम ‘डाय- हार्ड’ फॅन. त्याला कमालीचा आनंद झाला. प्रवास सव्वाआठ तासांचा होता. पण त्याला राहवेना. टेक-ऑफनंतर लगेचच त्यांना भेटायला तो त्यांच्या सीटपर्यंत पोहोचला. जर्मनीच्या हवेत तीस हजार फुटांवर आपल्याला आपल्या आवडत्या गायकाला भेटायला मिळण्याचा आनंद काही औरच ना? तेथे पोहोचल्यावर त्याने भीमसेनजींना नमस्कार केला आणि स्वतःची ओळख सांगितली, ‘मी येथे बॉनला व्याख्याता म्हणून काम करीत आहे. माझं नाव डॉ. पाकणीकर!’ यावर भीमसेनजी म्हणाले, ‘अरे वा! मग आमचे फोटोग्राफर पाकणीकर तुमचे कोण?’ ‘तो माझा पुतण्या.’ असं उत्तर काकाने दिलं; पण त्याला त्या क्षणी झालेल्या आनंदापेक्षा त्यानं नंतर मला हा प्रसंग सांगितला, त्या वेळी मला झालेला आनंद कैक पटींनी जास्त होता.

भीमसेनजींच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने १९९६ साली ‘स्वराधिराज’ नावाने एक ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. ग्रंथाचे हे नाव पु. ल. देशपांडे व सुनीताबाई देशपांडे यांनी सुचवलेले. त्यात भीमसेनजींच्या संग्रहातील अनेक फोटो व मी त्यांचे टिपलेले फोटो वापरले होते. त्या सर्व फोटोंचे एडिटिंगचे व त्याच्या संरचनेचे काम मी करणार होतो. त्या काळात माझ्या लँडलाइनवर त्यांचा फोन येत असे. ‘मी भीमसेन बोलतोय. कुठपर्यंत आलंय काम?’ हा त्यांचा पहिला प्रश्न असे. त्या ग्रंथात प्रत्येक फोटोशेजारी मी त्या-त्या फोटोग्राफरचा श्रेयनिर्देश नोंदवला होता. तसेच ग्रंथाच्या शेवटी फोटोंचा क्रम, त्याचा स्वामित्व हक्क व त्याचा संग्राहक अशी सूची दिलेली होती. मराठी पुस्तकात इतिहासात असे पहिल्यांदाच होत होते. मी केलेले हे काम त्यांना अतिशय आवडले. म्हणूनच स्वतः सही करून त्यांनी तो ग्रंथ मला भेट दिला.

त्यानंतर २००१ साली ‘स्वराधिराज’ याच नावाने मी एक प्रकाशचित्र प्रदर्शन केले व त्याबरोबर जगभरातील संगीत रसिकांना त्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी त्याच नावाची वेबसाइटही सुरू केली. माझ्या सुदैवाने त्याचेही उद्घाटन भीमसेनजी व डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. चालण्याचा त्रास होत असूनही भीमसेनजींनी तासभर हिंडून प्रदर्शन पाहिले. माझे खूप कौतुकही केले.

सवाई गंधर्व महोत्सवाला २००२च्या डिसेंबर महिन्यात ५० वर्षे पूर्ण होणार होती. मोठा पाच दिवसांचा कार्यक्रम करण्याचे मंडळाने ठरवले. तिकडे गणेशखिंड रोडवर ‘सवाई गंधर्व स्मारकाची’ वास्तू आकार घेत होती. बांधकाम सुरू असले तरीही काही भाग पूर्ण झाला होता. त्यातील आर्ट गॅलरीचे काम झाले होते. मला हे कळल्यावर माझ्या मनात एक विचार आला आणि मी थेट ‘कलाश्री’ या भीमसेनजींच्या घरी जाऊन धडकलो. त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत ते बसले होते. मला दारात बघून त्यांच्या नेहमीच्या खर्जातील आवाजात ते म्हणाले, ‘या...काय काम काढलं?’ मी घाईघाईने त्यांना सांगू लागलो, ‘अण्णा, स्मारकात आर्ट गॅलरीचे काम पूर्ण झाले आहे. माझ्याकडे १६ इंच बाय २० इंच आकारातील जवळजवळ पंच्याहत्तर कलावंतांच्या भावमुद्रा तयार आहेत. आपण जर स्मारकात त्याचं प्रदर्शन आयोजित केलं, तर ते बघण्यास जेंव्हा रसिक येतील त्या वेळी स्मारक कसं उभं राहिलंय हेसुद्धा त्यांना कळेल. आणि मग महोत्सवात आपण स्मारकासाठी जेव्हा निधीच्या उभारणीचे अपील करतो त्याला रसिकांचा नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल.’ माझं म्हणणं मी जितक्या घाईघाईने त्यांना सांगितलं तितक्याच शांतपणे त्यांनी ते ऐकून घेतलं होतं. पुढची दोन-चार मिनिटं ते काही बोललेच नाहीत. माझी मात्र चुळबूळ. मग जर्दा मळता-मळता धीरगंभीर आवाजात ते मला म्हणाले, ‘पाकणीकर, तुम्ही म्हणता ते खरं आहे; पण या वर्षी महोत्सवाचे स्वरूप मोठे असणार आहे. त्यामुळे आपल्याला आधीच स्वयंसेवक कमी पडणार आहेत. मग स्मारकावर कोण थांबणार? बरं दुसरं म्हणजे तेथे सळया व बांधकामाचे साहित्य पडले असणार... त्यात कोणाला अपघात झाला तर ते केवढ्याला पडेल? त्यामुळे आपण पुढे कधी तरी प्रदर्शन करू.’ विषय तेथेच संपला. मी जरासा हिरमुसलो; पण त्यांनी महोत्सवाच्या प्रमुखाच्या भूमिकेतून योग्य असा विचार केला आहे हेही मला जाणवले. मी तेथून निघालो.

घरी येताना मनात विचार सुरू होते, की ‘एवढा मोठा महोत्सव होतोय तर त्यासाठी आपण काही तरी वेगळे केले पाहिजे.’ आणि मनात थीम कॅलेंडरच्या कल्पनेचा जन्म झाला. म्हणतात ना... एक दरवाजा बंद झाला, तर दुसरा उघडतो. माझ्या हातात बराच काळ होता. आता डिजिटल युग सुरू झालं होतं. मी बारा कलावंतांच्या भावमुद्रा निवडल्या. त्या कृष्णधवल निगेटिव्ह्ज स्कॅन केल्या. त्यावर संगणकीय संस्करण केले. मुंबईच्या एनसीपीएच्या लायब्ररीत अनेक वेळा जाऊन त्या कलावंतांच्या मुलाखती वाचून त्यातून त्यांची शेलकी अशी एकेक वाक्यं निवडली. मग झाली माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरची डमी तयार. ती डमी कॉपी घेऊन मी परत कलाश्री गाठले. मला भीमसेनजींची प्रतिक्रिया पाहायची होती. मी डमी त्यांच्या हातात दिली. आणि त्यांचा चेहरा पाहत बसलो. ‘हं... व्वा’ अशी त्यांची दाद येऊ लागली. बाराही महिन्यांची पाने बघून झाल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘अण्णा, या कॅलेंडरचं प्रकाशन...’ माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्यांचे उद्गार आले, ‘महोत्सवात केलं.’ माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. ५०व्या सवाई गंधर्व महोत्सवात पहिल्याच दिवशी सवाई स्वरमंचावरून पं. भीमसेनजी व मंडळाचे सेक्रेटरी डॉ. एस. व्ही. गोखले यांच्या हस्ते ‘म्युझिकॅलेंडर २००३’चे प्रकाशन झाले. माझ्या थीम कॅलेंडरच्या प्रवासाला मिळालेला तो भीमसेनी आशीर्वाद आहे असेच मी समजत आलो आहे. यानंतर जेव्हाही मी ‘कलाश्री’वर गेलो त्या वेळी भीमसेनजी – ‘या कॅलेंडरवाले...’ असेच स्वागत करीत.

पुढे मी प्रदर्शनाबद्दल विसरूनही गेलो. एके दिवशी मला त्या वेळचे मंडळाचे सचिव गोविंद बेडेकर यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘प्रदर्शनाच्या तयारीला लागा.’ मला काही बोध होईना. त्यावर त्यांनी सांगितले, की ‘आज मंडळाची वार्षिक बैठक होती. त्यात भीमसेनजींनी सांगितले, की आर्ट गॅलरीत पाकणीकरांच्या फोटोचं प्रदर्शन करायचं आहे. त्यानीच गॅलरीचं उद्घाटन करू. तुम्ही तयारी करा व त्यांना तसा निरोपही द्या. म्हणून तुला फोन केलाय.’ दिलेला शब्द लक्षात ठेवून २८ ऑक्टोबर २००४ या दिवशी सवाई गंधर्व स्मारकात ‘म्युझिकल मोमेंट्स’ या माझ्या प्रदर्शनाचं उद्घाटन अण्णांनी केलं. माझं ते स्वप्नही पूर्ण झालं.

एकामागून एक आठवणी येत राहतात. त्या आपल्याला परत भूतकाळात घेऊन जातात. चलतचित्रांची मालिकाच जणू. आज अण्णा असते तर आपण सर्वांनी त्यांचा १००वा वाढदिवस संगीतमय जल्लोषाने साजरा केला असता. शेकडो रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या; पण मला नेहमी वाटत आलं आहे की ‘स्वराधिराज’ या ग्रंथाच्या वेळी कविवर्य विंदा करंदीकर यांनी चार ओळींत ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या समस्त भीमसेनप्रेमींच्याच प्रातिनिधिक भावना आहेत ना? कविराज म्हणतात –

प्रिय भीमसेनजी,
अमृताचे डोही । बुडविलें तुम्ही;
बुडताना आम्ही । धन्य झालों.
मीपण संपलें । झालों विश्वाकार;
स्वरात ओंकार । भेटला गा.

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
www.sateeshpaknikar.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WUTOCV
Similar Posts
कविवर्य ग्रेस... कॅमेऱ्याच्या अंधारजाळीतून असं म्हटलं जातं, की नातेसंबंध आपण निवडू शकत नाही; पण मित्र निवडीचे स्वातंत्र्य मात्र आपल्याला नेहमीच असते. असे असले, तरी कधीकधी आपल्याला असा अनुभव येतो, की मैत्रीही काही वेळा नकळत घडलेली असते. त्याला कोणतेही कारण नसते. धर्माची, वयाची, अनुभवाची, आर्थिक स्तराची अशी बंधनं नसतात. असते निखळ मैत्र! योग मात्र तसा जुळून यायला हवा
‘रसराज’ पंडित जसराज तसं म्हटलं तर शेवटच्या श्वासापर्यंत गात होते. ८९व्या वर्षी ‘सवाई’ त गायले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी पोहोचले. मग सारं जग ‘करोना’मय झालं. तरी यांचं ऑनलाइन शिकवणं सुरूच होतं. १७ ऑगस्ट २०२०ला त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला. ‘जसराज’ नावाचं एक
ग्वाल्हेर घराण्याची ‘स्वरमालिनी’ नामवंत प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनी राजुरकर यांच्याबद्दल लिहिलेला लेख...
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’ २९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language